शैक्षणिक वर्ष -2019-20
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस व जागतिक मराठी भाषा गौरव दिन दि २७ फेब्रुवारी २०२० रोजी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.दातीर उपस्थित होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्यस्थितीबाबत खंत व्यक्त केली,परंतू मराठी भाषेला समृद्ध परंपरा असून तिच्यात मोलाची भर घालण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे,असे त्यांनी सांगितले.तरी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील साहित्य वाचले पाहिजे,तसेच लेखन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्याना केले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून मराठीतून बोलण्याचा संकल्प सोडण्यास सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरुण ठोके यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून मराठी भाषेचा व्यावहारिक जीवनात उपयोग केला पाहिजे व दैनंदिन जीवनव्यवहार मराठी भाषेतून करण्याचा त्यांनी आग्रह धरला.प्रास्ताविकातून प्रा.मनीषा गुंडगळ यांनी ‘लोकसाहित्य : उत्सव मराठीचा’ ही कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट केली.या कार्यक्रमास कला विभागप्रमुख प्रा.एच.टी.वाघमारे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली व मराठी भाषेच्या साहित्याचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेण्यात आला.याद्वारे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील कुसुमाग्रज लिखित कवितांचे वाचन केले.राहुल याने ‘कणा’ या कवितेचे वाचन करून त्यातील आशय स्पष्ट केला.विक्रांत पगारे याने कविता सादर केली. व मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला.कु.विद्या पगारे हिने सूत्रसंचालन केले.